ग्रामपंचायत गावाची यशोगाथा व माहिती


विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची अल्पावधीत घेतलेली गगनभरारी..!!

"एकीचे बळ - मिळते फळ..!"

आदर्श गाव पांगरखेड येथे ग्रामस्थांनी सरपंच हे पद महिला राखीव असल्यामुळे ग्रामसभेद्वारे सौ. अंजलीताई शाम सुर्वे यांची प्रथम नागरिक (सरपंच) म्हणून निवड केली व उर्वरित ८ सदस्यांची निवड सुद्धा ग्रामसभेद्वारे करून एक नवीन पायंडा पाडला आहे.
ग्रामस्थांचा विश्वास सार्थक ठरावा म्हणून सरपंचा सौ. अंजलीताई सुर्वे यांनी स्वतःच्या मालकीच्या विहरीचे खोलीकरण व सरकारी विहरीवर पाईप लाईन स्वखर्चाने टाकून ग्रामस्थांना पाणी टंचाई च्या काळात मदत केली.
गावाचे नाव तालुक्यात व्हावे या दृष्टीने ISO नामांकन करिता धनादेश पाठवून तालुक्यातील प्रथम ISO ग्रामपंचायत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. मध्यंतरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा शासन आदेश प्राप्त झाला व सोबतच स्मार्ट ग्राम योजना सुद्धा महाराष्ट्र शासनाने सुरू केली. या दोन्ही स्पर्धेतील निकषांमध्ये ८० % साधर्म्य असल्यामुळे ग्रामसभा घेऊन लोकसहभागाची मागणी करण्यात आली. त्यात ग्रामस्थांनी उदंड असा प्रतिसाद दिला व सामान्य अशा ग्रामपंचायतीने असामान्य असे यश संपादन केले.